उंबरठ्यावरची पिढी...


उंबरठ्यावरची पिढी...

*८०... ९०... १००.,, सुटलोऽऽऽऽऽऽऽऽ...!*

ही साधारण या पिढीची खेळात राज्य कुणी घायचं हा निर्णय घेण्याची पद्धत होती. हो, खेळात, घराबाहेर पण खेळायचो आम्ही. मैदानात खेळणारी माझी पिढी. मुलांच्या खेळाचा वीडीओ गेम आणि मोबाईल या ब्लू व्हेलनी बळी घेतला नव्हता. तसं या ८०-९० च्या पिढीबद्दल या आधीही खूप जणांनी लिहिलंय, त्यामुळे मी काय अजून दिवे ओवाळणार असं वाटणं साहजिक आहे.

या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली...
टेप रेकॉर्डर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. मार्कशीट आणि टिव्हीच्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन गाडी गाडी खेळणं यात काहीही कमीपणा नव्हता. 'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का? पण होता. 'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते. मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

मित्राची बहिण ती आपली बहिण, असा सोपा हिशेब ठेवणारी ही पिढी. वर्गत किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी ही पिढी. पण गल्लीत कुणाच्याही घरात काहीही असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

सचीनच्या बॅटिंग बरोबर मोठी झालेली ही पिढी. कुंबळेच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर, अनिल कपूर - माधुरी च्या तेजाब वर वाढलेली ही पिढी. लक्ष्या-अशोक च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, निवेदिता, विनय आपटे, संजय मोने, सतीश पुळेकर ते अगदी कुशल बद्रिके, भाऊ कदम अमृता, सोनालीपर्यंत कलाकार पाहिलेली पिढी. 'जवा नवीन पोपट हा' वाली पिढी, वेसावकर मंडळी वाली पिढी,
रेकॉर्ड डान्स, फॅन्सी ड्रेस, स्लो सायकलिंग, एका काडीत जास्तीत जास्त मेणबत्त्या लावणे, छायागीत, चित्रगीत, रजनी, फौजी, सर्कस, स्पायडरमॅन, जायंट रोबोट, आय ड्रीम ऑफ जिनी, डोनाल्ड डक, डक टेल्स, फास्टर फेणे, गोट्या, बजाज चेतक, व्ही.सी.आर, झंकार बिट्स, झी टीव्ही, बाराडबा ट्रेन ते मेट्रो, फ्लॉपी, सीडी, डी. व्ही. डी., पेन ड्राईव्ह, ३८६-४८६-५८६ चे कॉम्प्युटर, यामाहा आर एक्स १००, बॅडमिंटन, क्रिकेट, कट्टा, एकल पडद्याची टॅाकीजं, एसी थिएटर, मल्टीप्लेक्स, गल्ल्या, रस्ते, बसकी घरं, बिल्डींग, टॅावर, मारुती ८०० ते होंडा सिटी, अॅटीना वाले टीव्ही, केबल टीव्ही, डीश टीव्ही, टेलेफोन, मोबाईल, गीपिआरएस, स्मार्टफोन, व्हॅाटसअॅप, एफ.बी., ९३ च्या दंगली, बाबरी, कार सेवा, अतिरेकी हल्ले, २६ जुलै.....
असल्या असंख्य गोष्टींचा कॅलीडोस्कॉप सतत डोळ्यासमोर असणारी पिढी.

व. पु. काळे, जी. ए. कुलकर्णी, भा. रा. भागवत, बालकवी, शांता शेळके, रणजीत देसाई माहित असणारी आणि 'अण्णू गोगट्या होणे' किंवा 'यमीपेक्षा सहापट गोरी' म्हणजे काय हे सांगावं न लागणारी बहुधा शेवटची पिढी.
शिवरायांना कुठल्याही धर्माचे न मानता 'स्वराज्य संस्थापक' मानणारी, कलामांना फक्त शास्त्रज्ञ मानणारी ही पिढी.

कितीही शिकलं तरी 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर विश्वास असणारी आणि कुठल्याही पदावर बसलं तरी आपण 'सुरु कुठून केलं' याच भान असणारी ही पिढी. 'शिक्षकांचा मार खाणं' यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी. ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी. वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी.

३१ डिसेम्बरला दणकून पार्टी करणारी पण वयाच्या पन्नाशीतही जर मोठ्या कामाला निघायचं असेल तर देवाला आणि आईला नमस्कार करून निघणारी पिढी. परदेशी नोकरी मिळवण्याचा उच्चांक या पिढी कडे असेल, पण यांना परदेशी जाऊन त्या देशाचा रंग नाही चढला. पंकज उधासच्या _'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_ या ओळीला डोळे पुसणारी, दिवाळीला 'पाच दिवसांची कथा' माहित असणारी आणि संक्रांति किवा नारळी पौर्णिमेची किंवा कोजागिरी पासून सर्वपित्री पर्यंत सगळी माहिती असणारी पिढी. आजही आवर्जून रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणारी, स्वतः चुकलं असं वाटलं तर गाडीत बसून चालणाऱ्याला सॅारी म्हणणारी, साहेबाला 'रीस्पेक्टेड सर' असं लिहिणारी पिढी.

थोडक्यात ही उंबरठ्यावरची पिढी.....

माधुरीच्या 'धकधक' वर थिरकणारी पिढी, जिला सनी लिओनि मात्र 'अनवांटेड एकस्पोज' वाटतं. लिव्ह इन सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी पिढी. रस्त्यात मिठी किवा चुंबन म्हणजे शो ऑफ मानणारी, शाळा कॉलेज मध्ये प्रेम करणे किवा ते बोलून दाखवणे याची हिम्मत नसणारी पिढी.

लग्न हा संस्कार मानणारी, घटस्फोट हा शब्द अस्पृश्य मानणारी पिढी, लग्झरी गाडी घेताना मायलेजचा हिशेब करणारी, रस्त्यात स्वतःचे सोडा पण जुन्या मित्राचे पालक, किवा पत्नी मुलं दिसली तरी हातातली सिगरेट लपवणारी पिढी.

पार्टी मध्ये विमान उडल्यावर जुन्या हळव्या आठवणी काढून डोळे पुसणारी पण सकाळी उठल्यावर डोकं आणि स्मेल दोन्ही जागेवर आहे हे इन्शुर करणारी पिढी. 'दिलीप वेंगसरकर' आणि 'विराट कोहली' दोघांवरही बोलून पुन्हा 'सचीनच ग्रेट' असं म्हणणारी ही पिढी.

माझ्या मते करीयर मध्ये सगळ्यात जास्त वेळा जागतिक मंदी सोसणारी आणि तरी दमदार वाटचाल कायम ठेवणारी पिढी. मला वाटत या पिढीने अगदी काही हालात वगैरे दिवस नसतील काढले, पण स्थित्यंतरं मात्र इतकी जास्त पहिली आहेत की या पिढीला बहुधा स्थिर होताच आलं नाही.

सतत नवीन येणाऱ्या घटनांशी जुळवून घेताना पन्नाशीत आली ही पिढी. या पिढीतल्या प्रत्येकाचं काही न काही राहून गेलंय ही जुळवाजुळव करताना... मग ती थकबाकी कधी तरी मित्रांच्या पार्टी मध्ये किंवा स्वप्नात करत असते ही पिढी. त्यामुळे सतत नॅास्टॅल्जीया जगणारी, अति आनंदानी हुरळून न जाणारी आणि लहान सहान अपयशानी आत्महत्या न करणारी ही पिढी...

ऐंशीत जन्म, नव्वदीत तारुण्य, शंभरी मध्ये सुट्ट्यो करून प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगाचं राज्य स्वतःवर घेऊन मागच्या ब्लॅक अँड व्हाईट पिढीला पुढच्या रंगीबेरंगी अॅनिमेटेड जगाशी जोडणारी ही पिढी...
पुन्हा डोळे झाकुया???

_"- १०, २०, ..... ८०... ९०... १००.,, सुटलो" ...

- Source : A Whatsapp Forward...
- Author : Unknown...

Comments