समयसूचकता... भाऊ तोरसेकर
आणखी काही दिवसांनी पॅरीस येथील बॉम्बस्फ़ोट मालिकेला दोन वर्षे पूर्ण होतील. तिथे अकस्मात बॉम्बस्फ़ोट होऊ लागले आणि एकामागून एकाचवेळी अनेक भागात असे स्फ़ोट झाले. त्यात १३० लोकांचा काही क्षणात बळी गेला, तर शेकडो नागरीक जखमी जायबंदी झाले.
खरेतर त्याच्याही चौपट पाचपट लोकांचा त्यात बळी जाऊ शकला असता. त्यातले शेकडो लोक स्फ़ोटाने नव्हेतर नुसत्या चेंगराचेंगरीनेच मृत्यूच्या दाढेत ओढले गेले असते. कारण सर्वात मोठा घातपात हजारोची गर्दी जमली होती, तिथे घडला होता. पण राष्ट्रगीताने तितके मृत्यूचे तांडव होऊ दिले नाही.
'स्टाड द फ़्रान्स' या भव्य स्टेडीयमवर तेव्हा जर्मनी व फ़्रान्स यांच्यातला अटीतटीचा फ़ुटबॉल सामना रंगलेला होता आणि तिथेही स्फ़ोट झालेला होता. तसे काही घडल्याची कल्पना येताच पळापळ व चेंगराचेंगरी होईल, हीच घातपात्यांची कारस्थानी योजना होती. पण तसे काही होऊ शकले नाही. कारण एका चतुर देशाभिमानी क्रीडारसिकाची समयसुचकता होती.
तात्काळच स्फ़ोटाची जागा असलेले स्टेडीयम मोकळे करण्यासाठी झुंबड उडाली आणि हजारो प्रेक्षकांना तिथून अल्पावधीत बाहेर पडणे शक्य नव्हते. कारण बाहेर पडायचे मार्ग एकफ़िन्स्टनच्या पादचारी पुलासारखेच अरुंद व निमूळते होते.
लोकांची बाहेर पडण्यासाठी झुंबड उडाली, तेव्हा त्या धक्काबुक्कीत चेंगराचेंगरी होण्याचा धोका ओळखून, आपल्या फ़्रेन्च देशबांधवांना धीर देण्यासाठी कुणा नागरिकाने उच्चरवात राष्ट्रगीत गायला सुरूवात केली आणि त्यानंतर काही क्षणातच अवघा हजारोचा जमाव खड्या स्वरात फ़्रान्सचे राष्ट्रगीत गावू लागला. त्यांचा आवाज स्टेडीयम व त्याच्या आवारात दुमदुमू लागला आणि क्षणार्धात अवघी गर्दी भयमुक्त होऊन परस्परांना मदत करायला सज्ज झाली.
कुठलीही चेंगराचेंगरी झाली नाही व चाललेली धावपळ थंडावली. शांत संथ गतीने ती गर्दी सुखरूप बाहेर पडली. त्यात म्हातारे मुले व महिलाही होत्या. पण कोणाला कसली इजा पोहोचली नाही. हे काम तिथे हजर असलेल्या पोलिसांनी केले नाही की कुणा रक्षकांनी केले नाही. कोणी स्वयंसेवक त्यासाठी कार्यरत झाले नव्हते. नुसत्या राष्ट्रगीताने त्या हजारोच्या जमावाला आपण सर्व एका देशाचे नागरिक म्हणून परस्परांचे बांधव असल्याची जाणिव दिली. त्या जाणिवेने जे काम केले, ते कुठला कायदा वा यंत्रणा करू शकत नव्हती. त्या संकटसमयी राष्ट्रगीताची महत्ता काय असते, ते लोकांनी अनुभवले.
एल्फ़िन्स्टनचा पादचारी पुल असो किंवा फ़्रान्सचे ते भव्य स्टेडीयम असो, दोन्हीकडे तितकाच सैरभैर झालेला जमाव होता. कदाचित फ़्रान्सचा जमाव अधिक भयग्रस्त होता. पण त्याला नुसत्या राष्ट्रगीताने व त्याच्या गुणगुणण्याने धीर दिला. ज्याचा अभाव एल्फ़िन्स्टन स्थानकात होता. कारण भारताप्रमाणे फ़्रान्समध्ये अतिशहाणे लोक राष्ट्रगीताच्या उपचाराची गरज काय असल्याची विचारणा करण्याइतके प्रगत नसावेत. म्हणून तिथे संकटसमयी बाकी यंत्रणा ठप्प झाल्या असताना, जखमी फ़्रेन्च जनतेसाठी राष्ट्रगीत एक जालीम ‘उपचार’ ठरला. शब्द एकच म्हणजे उपचार असला, तरी त्याचे दोन भिन्न अर्थ ज्यांना समजू शकतात, ते सामान्य बुद्धीचे लोक असतात.
देश, समाज वा संस्था संघटना यांची कुठलीही बोधचिन्हे वा सन्मानचिन्हे यांची महत्ता कसोटीच्या प्रसंगी अनुभवास येत असते.
" जाणते " पत्रकार भाऊ तोरसेकर
Comments
Post a Comment